Wednesday, 18 June 2025

मी वाट पाहतेय

*मी वाट पाहतेय*


              निशांतला पाच वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर परदेशात चांगल्या पगाराची नौकरी मिलाळी होती. त्यामुळे निशांत गाव सोडून परदेशात गेला त्या गोष्टीला साडेचार वर्ष झाली होती. त्याच्या येण्याची वाट पाहत कविता आता कंटाळली होती. त्यांचं फोनवर अधून मधून बोलणं होत असायचं. पण म्हणावा तितका वेळ निशांत तीला देत नव्हता कारण त्याचा जॉबचं तसा होता. मनात असूनही त्याच जास्त वेळ कविताशी बोलणं होत नव्हतं, आणि इकडे त्याच्या शिवाय कुणाशीही लग्न करणार नाही असं तिने मनोमन ठरवलं होतं.
               तिच्यावर घरच्यांचा दबाव आता वाढत चालला होता, कारण तिचं लग्नाचं वय निघून चाललं होतं. कविता आता तिशीच्या घरात होती. घरच्यांनी आता पर्यंत तिच्यासाठी खूप स्थळं बघितली होती. पण काहीतरी कारण सांगून ती प्रत्येकाला नकार घंटा कळवायची. येणाऱ्या प्रत्येकाला कविता आवडायची कारण दिसायला सुंदर, गोरी गोमटी, सोज्वळ, शिकलेली सगळ्या गोष्टीत हुशार त्यामुळे सगळ्यांचा होकार असायचा. पण कविता मात्र निशांत साठी वेडी पिशी झालेली. म्हणतात ना पाहिलं प्रेम विसरता येत नाही, तसंच निशांत कविताचं पाहिलं प्रेम होतं आणि निशांतही तसाच होता देखणा, रूबाबदार, राजबिंडा आणि कविताच्या स्वप्नांतला राजकुमार होता. कविताने ठरवलेला होता अगदी तसाच,पण कविता वयाने दोन वर्षाने त्याच्यापेक्षा मोठी होती. तरीही निशांत आणि कविताचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. स्वतःच्या पायांवर उभं राहिल्याशिवाय लग्न करायचं नाही असं दोघांनी मिळून ठरवलेलं होतं. 
                पण कविताच्या संयमाचा आणि धैर्याचा बांध घरच्यांच्या दबावापुढे ढिसूळ होत चालला होता. काय करावे तीला सुचत नव्हते इकडे निशांतचा पाच वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट संपायला सहा महिने बाकी होते. त्यालाही आता गावी परत येण्याचे वेध लागले होते. पण सहा महिने तरी त्याला येता येणार नव्हते त्यामुळे तो ही आता सतत चिंतेत असायचा. कविताचे जर लग्न झाले तर सगळं काही संपेल, इतक्या दिवसांचा केलेला प्रेमाचा त्याग त्याला काहीच अर्थ राहणार नाही हे तो जाणून होता. कविता मात्र त्याच्या परत येण्याच्या आशेवर शांत आणि निशब्द होती. घरचेही तिच्या चिंतातूर चेहऱ्याकडे पाहून हैराण झाले होते. नेमके कारण ही ती कुणालाच सांगत नव्हती. कारण तीला भीती होती माझं कुणावर प्रेम आहे असं जर मी सांगितलं तर घरचे लग्नाचा दबाव आणखी वाढवतील त्यामुळे कविताने शांततेचा मार्ग धरला होता.
                 एक दिवस कविताचे मामा घरी येतात. येण्याचं कारण ही तसंच होतं ते पुन्हा एकदा कवितासाठी स्थळ घेऊन आले होते. मुलगा उच्च पदाच्या सरकारी नौकरीला होता गडगंज श्रीमंत एकुलता एक. तीस पस्तीस एकर बागायती शेती,बंगला गाडी, नौकर चाकर अगदी सगळं काही. कविता त्या घरात गेली कि महाराणी सारखी राहील असं सगळं काही मामा घरच्यांना पटवून देत होता. सगळ्यांनी हे स्थळ तरी हातचं जाऊ द्यायचं नाही असं ठरवलं कारण मुलाकडची पार्टी जशी श्रीमंत पैसेवाली होती त्यापेक्षा काकणभर शिल्लक कविताची श्रीमंती होती. एक दिवस बघण्याचा कार्यक्रम ठरतो आणि मुलाकडील मंडळी कविताच्या घरी येतात.
             कविताला सजून धजून छानशी साडी नेसून हातात तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन पाहुण्यासमोर बोलवलं जातं. मुलाकडील एक वयस्कर व्यक्तीच्या हातात पाण्याचा लोटा देत कविता बाजूच्या खुर्चीवर बसते. नाव मामाचं गाव शिक्षण तिच्या काय अपेक्षा आहेत सगळं काही विचारलं जातं आणि मुलाला मुलगी पसंत पडते. या वेळी कविताच्या पसंतीचा विचार कुणीही करणार नव्हतं कारण कविताच्या आईची तबियत खूप शिरीयस होती. त्यामुळे तिच्या डोळ्यसमोर कविताचे हात मेहंदीने रंगलेले अंगाला हळद लागलेली आणि तिच्या डोक्यावर अक्षदा पडलेल्या बघायच्या अशी कविताच्या आईची शेवटची इच्छा होती. म्हणूनही या वेळी कविताचा नाईलाज होता. सगळं काही ठरतं देण्या घेण्याचं मनापानाचं अगदी साखरपुड्याची तारीख ठरवली जाते येणाऱ्या तीस तारखेला म्हणजे फक्त पंधरा दिवसाने कविताचा साखरपुडा ठरवला जातो. आणि सगळी मंडळी साखरपुड्याच्या तयारीला लागतात.
                कविताला आता खऱ्या अर्थाने वेड लागायची पाळी येते. तिच्या हातात आता काहीच उरलं नव्हतं. आईच्या इच्छेखातर तीला या लग्नाला होकार द्यावा लागला. पण अगदी डोक्यावर अक्षदा पडेपर्यंत कविता निशांतची वाट पाहणार होती. घरातले सगळे वडीलधारे लहान मंडळी खूप आनंदात होती. घरात लग्न कार्य असल्यामुळे पुरुष मंडळी खरेदीच्या तयारीला तर बायाबापड्या कुरडया शेवया पापड अशा रुखवताच्या तयारीला लागल्या होत्या. साखरपुडा झाल्याबरोबरच लग्नाची जवळचीच तारीख पकडली जाणार होती.
                कविताने ही आता नियतीच्या आणि नशीबाच्या भरवशावर सगळं काही सोडून निशांतला शेवटचा कॉल करायचं ठरवलं. ती घरात सगळ्यांच्या नजरा चुकवत गच्चीवर जाते आणि निशांतला कॉल डायल करते. नेहमी बिझी असणारा निशांत या वेळी मात्र फ्री होता आणि त्याने एकाच रिंगमध्ये फ़ोन उचलला आणि कविता बोलायच्या अगोदर तो बोलू लागला, "अगं..! मी आता तुलाच फ़ोन लावणार होतो आणि तुझाच कॉल आला बघ!" कविता काही बोलणार त्या आधीच तो बोलू लागला. " ऐक ना.! एक आनंदाची बातमी तुला द्यायची आहे,.मला फक्त एकच महिना इकडे रहायचे आहे आणि पुढच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात मी तुझ्याजवळ असेन!" कविता शांत होती काय बोलावे तीला समजत नव्हतं. ज्या क्षणांची ती वाट पाहत होती तो क्षण जवळ आला होता. ती हळूच उदगरली, "माझं.. लग्न ठरलंय निशांत..!" आणि ती शांत झाली."अगं पण, हे कसं शक्य आहे..! तुझं जीवापाड प्रेम होतं ना माझ्यावर. मग असा निर्णय कसा घेतलास तू..!"  "प्रेम होतं, अरे प्रेम आहे म्हणुन तुझी तीन वर्षे वाट बघतेय मी." कविता बोलत होती. "तुझ्यासाठी किती मुलांना मी रिजेक्ट केलं हे माहित नाही तुला. आज माझी आई सिरीयस आहे तिचा भरवसा नाही आणि तिची शेवटची इच्छा आहे माझं लग्न व्हावं..! मग मुलगी म्हणून म्हणून मी तिची एवढी इच्छा ही पूर्ण करू नये..!" कविताचे बोलणे ऐकून निशांत शॉक होतो. "अगं मी येतोय, सांग घरच्यांना तुझ्यासाठी मी मी दिवस रात्र काम करून सहा महिन्या ऐवजी दोन महिन्यात येण्याचं बघतोय आणि तू..!" कविता एकदम निरागसपणे बोलू लागली. "निशांत मी तुझी बोहल्यावर चढेपर्यंत वाट पाहीन. तुला यावंच लागेल माझ्या डोक्यावर अक्षदा टाकण्यासाठी, कारण तू जर आलास तरच मी माझा संसार सुखाचा करीण!" कविताच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. "मी तुझी वाट पाहीन, मी तुझी वाट पाहीन.!" आणि कविता कॉल कट करते.. 
                निशांत आणि कविताने एकमेकांवर, जीवापाड केलेल्या प्रेमाचा अंत आता जवळ होता, निशांतच्या प्रेमाची खरी परीक्षा होती. कारण खरं प्रेम तर तेच असतं ना,जे वेळ आल्यावर स्वतःच्या प्रेमाचा त्याग करून आपल्या प्रेमाला नेहमी सुखात पाहू शकेल.!

©®
गजेंद्र ढवळापुरीकर 
स्वराजनगर छ. संभाजीनगर 
मो. 9623714011