Wednesday, 23 October 2024

तू दोरा मी पतंग

तू दोरा मी पंगत

नको लावू गं आस वेडी 
घे जाणून कदर थोडी,
उसवलेल्या भावानांची 
बांधू कशी मी गाठोडी.//१//

मिठीत तुझ्या मिळे उबारा 
वेदनांचा गळे शहारा,
मोहमाया हि जळून जाई
संपून जाई कोंडमारा..//२//

मन बावरे न ऐके कुणाचे 
दुःख हळवे त्यात साचे,
गंध सुखाचा त्यास मिळता 
प्रेमात तुझ्या अलवार नाचे..//३//

शर्त लावू आता कुणाशी 
तु माझी बोलतो मनाशी,
उंच आभाळी जाता झोका 
खंत नाही मला जराशी..//४//

आयुष्य होते माझे बेरंग 
तूच उठविले मनी तरंग,
येता झुळूक एक वाऱ्याची
तू हो दोरा मी तुझा पतंग..//५,,//

©®
गजेंद्र 
एस टी कॉलनी स्वराजनगर 
छ. संभाजीनगर 
मो:९६२३७१४०११

पाऊलांचे ठसे

*पाऊलांचे ठसे*

या भूमीवर जन्म घेतलेला
शोधतो आहे जगायला
एक छोटासा कोपरा...
जगतात तर किडे आणि मुंग्याही 
पण माणूस म्हणून जगताना
होणारी तगमग उध्वस्त 
करत असते माणसाला...
वावर असतो आजूबाजूला 
आपल्याच माणसांचा
विषारी डंख मारण्यासाठी...
ज्यांना जगणं जमलं 
ते सुसाट गेले धावत आपल्याच धुंदीत
मागे राहिल्यात फक्त आठवणी 
आणि त्यांच्या पाऊलांचे ठसे..!

©®
गजेंद्र 
एस टी कॉलनी 
स्वराजनगर 
छ. संभाजीनगर.

Monday, 7 October 2024

आता जगावेसे वाटत नाही

हल्ली स्वप्न ही पहावेसे वाटत नाही,
कारण एकच की आता जगावेसे वाटत नाही..

होऊ शकते त्यांच्या शिवाय जगणे,
पण श्वास उसने पुन्हा घ्यावेसे वाटत नाही..

उभा राहू शकतो स्वप्नातील डोलारा
आधाराचे कुंपण त्याला लावावेसे वाटत नाही..

जवळच आहे माझ्या पडीक असे मन
ओलाव्याचे शिंपण त्यास करावेसे वाटत नाही..

रोज घेत असतो मी गुदमरलेला श्वास,
गहिवरलेले आभास त्यास द्यावेसे वाटत नाही..

©® गजेंद्र 
छ. संभाजीनगर
मो:९६२३७१४०११