Tuesday, 6 October 2026

gajendrachya kavita 8

[8/28/2023, 10:40 AM] G.k.: *आक्रोश होता तहानलेला*

मी..हो मीच
मनाच्या गाभाऱ्यातील
जपून ठेवलेले तुझे प्रतिबिंब,
आजही त्याच अवस्थेत आहे
तुझी वाट पाहत त्याच वळणावर,
मागासलेले विचार आणि रुढींच्या
गर्द छायेत अडकून पडलेल्या
तुझ्या निस्सीम प्रेमाची किंचितही
झलक दिसत नाही त्यावर,
म्हणून विश्वास ठेवावा की नाही
याच विचंनचनेत सापडलं आहे
माझं मुर्दाड झालेलं शरिर..!

तरीही मी...
का कोणास ठाऊक
रात्रीच्या त्या गडद अंधारात 
शोधत असतो आभाळभर,
जपून ठेवलेल्या आठवणींना,
पापणीच्या पडद्याआड जाऊ न देता
खोलवर हृदयात ठिणगी पेटणाऱ्या भागात,
विरहाने जळून राख राख झालेल्या
तुझ्या माझ्या क्षीण भावनांच्या
लक्त्तरांचे छोटे छोटे तुकडे करून
अडगळीच्या खोलीत टाकून देईस्तोवर..!

कुठून तरी 
वाऱ्याची झुळूक यावी
आणि त्या स्पर्शाने जाग यावी मला,
भासावं तूच आहेस आजूबाजूला
माझी काळजी घेण्यासाठी,
बहुदा, असं होणार नाही कधीच
कारण तू तर नाहीस या जगात,
मी उगाच तुझ्या येण्याची
इच्छा बाळगून आहे उरात,
छिन्न विछिन्न झालेल्या मनाला
खात्री होइपर्यंत तुझ्या येण्याची
सोशिक समजूत काढत..!

पण..!
आक्रोश होता तहानलेला
शेवटच्या टप्प्यावर अंतिम
श्वासांच्या आत गुरफटलेला,
चिंब चिंब होऊन जीर्ण झालेला
टिपूर चांदण्याच्या प्रकाशात,
चंद्राच्या शीतल छायेतून निघून
धगधगनाऱ्या सूर्याच्या
आग ओकणाऱ्या बिंदूत समावण्यासाठी,
पुन्हा परतीच्या प्रवासाला 
तुझ्या साक्षीने सुरवात करण्यासाठी..!

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर छ.संभाजीनगर
दि.२८/०८/२०२३ सोमवार
[8/30/2023, 8:05 PM] G.k.: *धारित्रीच्या खोल गर्भात*

धरती माय रोज पाहत असते
अनेकांच्या सुखदुःखाने भारलेली गाथा
वाचत असते सर्वांचं गुपीत
तिला कळलेलं असूनही नुसतं पाहत राहणं
हेच काय तिचं रोजचं आयुष्य..!

भ्रष्टाचारी बलात्कारी दहशदवादी
रोज तिच्याशी हातमिळवणी करायला बघतात,
पण आपलं कोण आणि परकं कोण
ओळखण्यात ती कमी पडते,
म्हणून तर यांचं भागतय
आणि तिलाच विकण्याचं षडयंत्र
दृष्ट वृत्तीचे लोक करू पाहतायेत..!

पण धरित्रीच्या खोल गर्भात
जसा लाव्हा तळपतोय 
तसच आमचं रक्त उसळ्या मारत आहे,
आमच्या भारतभूच्या रक्षणासाठी,
एक दिवस येईल असा 
ही धरती हि भारतमाता
आक्रोश करेल आणि पेटून उठतील
तिला सर्वस्व मानणारे उदारमतवादी,
डोके फोडतील चाकू भोसकतील
परिणामी हाती शस्त्र उचलतील,
आणि या भुमातेचं रक्षण करतील..!

©®
गजेंद्र ढवळापुरिकर
स्वराजनगर छ.संभाजीनगर
दि.३०/०८/२०२३ बुधवार
[8/31/2023, 6:23 PM] G.k.: *राखी पौर्णिमा*

रक्षाबंधनाचा सण 
भाऊ बहिण नात्याचे पवित्र बंधन
प्रेम माया ममता जिव्हाळा
यांचा जुळून येणारा संगम..!

राखी असो हिऱ्या मोत्याची
एका रुपयाची किंवा हजाराची,
राखीचा मान असतो अनमोल
ती असली जरी नुसती धाग्याची..!

भावाकडे असो धन दौलत
मोठा सावकार असो किंवा करोडपती,
एक रुपयातही ती खुश असते कारण
बहिणीला हवी फक्त अनमोल नाती..!

राखीमधला अनमोल धागा
जोडून ठेवतो अखंड बहिण भावाला,
वर्षातून एकदा बहिण माहेरी
येत राहील राखी पौर्णिमेच्या सणाला..!

®©
गजेंद्र ढवळापुरिकर
स्वराजनगर छ. संभाजीनगर
दि.३१/०८/२०२३ गुरूवार
[9/1/2023, 6:11 AM] G.k.: *तुझ्या एका नजरेसाठी*

तुझ्या एका नजरेसाठी
सांग किती किती रडायचं,
तूच समोर असल्यासारखं
चलत चलत पडायचं..!

विरहाच्या अग्निमध्ये
का वेडे होऊन झुरायचं,
रात्रंदिवस आठवणीत
मी तीळ तीळ मरायचं..!

मनावरचे घाव जहरी
विसरून पुन्हा उठायचं,
हसत हसत तुझ्या मिठीत
दुःख बाजूला सारून भेटायचं..!

प्रेमात भान हरपून सारे
मी टक लावून बघायचं,
नजरेला नजर देवून तुझ्या 
सांगना कुठवर जगायचं..!

फास आवळुन गळ्याभोवती
प्रेमात किती जळायचं,
फक्त तुझ्या एका नजरेसाठी
मी अश्रूंना सांगितलं गळायचं..!

जोखीम तुझ्या प्रेमाची
पत्करून किती मी रुसायचं,
ठरवलं आयुष्याच्या प्रवासात
फक्त तुझ्यासाठी हसायचं..!

®©
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर छ.संभाजीनगर
दि.३१/०८/२०२३ शुक्रवार
[9/1/2023, 12:35 PM] G.k.: *श्रावण*

श्रावण रसाळ
श्रावण मधाळ
श्रावण प्रेमाचा
उधळे गुलाल..!

श्रावण पाऊस
श्रावण हाऊस
श्रावण जोडतो
प्रेमाने माणूस..!

श्रावण चैत्राचा
श्रावण मैत्राचा
श्रावण जिव्हाळा
लावतो प्रेमाचा..!

श्रावण हिरवा
श्रावण बरवा
श्रावण प्रीतीचा
मधुर गोडवा..!

श्रावण अल्याड
श्रावण पल्याड
श्रावण पाऊस
उघडी कवाड..!

श्रावण चंदेरी
श्रावण सोनेरी
श्रावण उभा हा
घेऊन शिदोरी..!

®©
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर छ.संभाजीनगर
दि.31/08/2023 शुक्रवार
[9/4/2023, 11:45 PM] G.k.: *अस्वस्थ मातीचं हृदय*

अस्वस्थ मातीचं हृदय
पाण्याच्या एका थेंबासाठी,
कोरड्या उष्ण हवेनं
दाब टाकलाय जणू
आभाळाच्या पोकळीवर,
आणि शोषून घेतलंय पाणी
ढगांच्या आत दडलेलं..!

मुर्दाड झालेल्या पावसानं
कात टाकून यावं जमिनीवर
ढगांची छाती फाडून,
अन् व्यापून टाकावं
धरित्रीचं कोरडं पडलेलं गर्भार..!

तहानलेली जनावरं
भूक मेलेली माणसं,
आकाशी पाण्याच्या शोधात
सैरावैरा उडणारी पाखरं,
सोशिकतेच्या पलीकडे गेलीय
यांची विचार करण्याची पद्धत..!

कुठूनतरी एखादा
काळा ढग आभाळी यावा,
बरसून जावं त्यानं मनसोक्त
व्याकुळ झालेल्या प्रत्येक गोष्टींवर,
आणि फुलून जावं माझं गीत
पावसाच्या हालचालीवर..!

®©
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर छ. संभाजीनगर
दि.02/08/2023 शनिवार
[9/5/2023, 3:26 PM] G.k.: *विभिन्न सुगंधाच्या गुलदस्त्यात*

कदाचित प्रत्येकाला
नकोय नात्यांचं जोखड,
ठरवलेल्या कामातून
कोलांटऊड्या मारते हुजरेगीरी,
आजच्या तमाशाप्रधान युगात
तालावर नाचताना काहींची
नाहक उडते भाबेंरी,
तकलादू आयुष्य जगण्यापेक्षा
स्वबळावर मेहनतीनं करावं पारडं जड
आणि वरचढ व्हावं श्रीमंताच्या शिरी..!

संकुचित भावनाचं मोहळ
उठत असतं 
रिकामटेकड्या डोक्यात
आणि भाराभर कल्लोळ
माजत असतो माणसांच्या
संकुचित झालेल्या देहात..
माळरानावर उगवतात कुसळं
तशा मोक्कार ठिणग्या उसळती
वारं भरलेल्या पायांत..!

'स्व' ला खाजून आवधान
आणणाऱ्या असतात काही
बेलगाम नासक्या वृत्ती,
सलोख्याचे घर बांधणाऱ्या
सजीव हातांना असते
त्यांची नाहक भीती..!
विभिन्न सुगंधाच्या गुलदस्त्यात
कदाचित बांधून मनाला
ओंजळ होत असते रीती..!

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर छ.संभाजीनगर
दि.०५/०९/२०२३ मंगळवार
[9/5/2023, 3:34 PM] G.k.: *आयुष्याच्या गणितासाठी*
(नवाक्षरी रचना)

खाच खळगे आयुष्याचे
भरण्यात असतो दंग,
बेफिकीर हे मनुष्याचे
भासते कितीतरी रंग..!

बेपर्वा जीवनाची गाडी
बेधुंद धावते सुसाट,
वळवाच्या पावसापरी
अधांतरी भासे वहिवाट..!

अर्धसत्य या जीवनाचे
दडवले ज्वालामुखीत,
निसंकोच सांगवावे का 
जीवनाचे गर्द गुपित..!

डोंगरावाणी छातीवरी
खांबासारखा दृढ उभा,
दुःखाचा खाचा भयावह
आनंद नाही वेड्या जीवा ..!

मंतरले माणिक मोती
आयुष्याच्या गणितासाठी,
हिशोब मध्यस्थीतांचा हा
उठते कपाळाला आठी..!

®©
गजेंद्र  ढवळापुरीकर
स्वराजनगर छ. संभाजीनगर
दि.०४/०९/२०२३ सोमवार